निस्वार्थता – एक जीवन शैली
नेहमीप्रमाणेच तो एक सामान्य दिवस होता… पण खरंच सामान्य दिवस होता का तो? माहीत नाही… मी रस्त्यावरून चालत असताना एका गरीब माणसाला पाहिलं… तो पैसे मागत होता इकडे तिकडे… कोणीतरी काहीतरी मदत करेल, काहीतरी देईल या आशेने… तितक्यात एका गाडीतून एक माणूस खाली उतरला… बरा श्रीमंत असावा तो… छे !!! असावा नाही होताच तो… त्याचे कपडे त्याची श्रीमंती सांगत होती… तो गरीब माणूस मोठ्या आशेने गाडीच्या दिशेने धावला… काहीतरी मिळावं या भावनेने… पण श्रीमंत माणसाने त्याला बाजूला सारलं… आणि झपाझप पावलं टाकत पुढे निघून गेला… माझी पावलं पण पुढे पडायचा प्रयत्न करत होती… तितक्यात एका क्षणाचाही विलंब न करता तसाच एक गरीब माणूस पुढे सरसावला… त्याने दुसऱ्याला आधार दिला..आणि बघता बघता स्वतः कडचे सगळे पैसे त्याला देऊन टाकले… आणि स्वतः रिक्त होऊन तो चालू लागला… दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद देऊन… स्वतःकडे काहीच न ठेवता…
थोडा काळ असाच निघून गेला… पण ते दृश्य काही माझ्या मनातून जात नव्हतं… सारखं तेच आठवत होत… कोणी कोणाला अस कसं देऊन टाकू शकत सगळं… स्वतःचा विचार न करता… आणि मला कोणाची तरी आठवण झाली…
होय… महाभारतातील कर्णाची… पण कोण होता तो? ते सांगणं तितकं सोपं कुठे होत? … पण आपल्या आईवडिलांच्या पायाला तेल लावून त्यांची सेवा करणारा राधेय होता तो… गंगा नदीच्या पात्रात तासन् तास उभं राहून सुर्यदेवाला अर्घ्य देणारा सुर्यपुत्र होता तो…
स्वतचं अभेद्य कवच आणि कुंडल धारण केलेला असा मृत्युंजयी योद्धा होता तो… इंद्र देवालाही भिक्षा म्हणून मुक्तहस्ताने आपले कवच कुंडल दान करणारा क्षत्रिय होता तो… आपण दुर्योधनाला दिलेल्या वचनाला जपणारा अंगराज होता तो… गुरू द्रोणांकडून ब्रम्हास्त्राची शिक्षा नाकारला गेलेला सूतपुत्र होता तो… अलर्क किड्याने आपला पाय पोखरलेला असतानाही आपल्या गुरू आज्ञेसाठी मनावर संयम ठेवणारा आणि शापित ब्रह्मास्त्र धारण केलेला परशुराम शिष्य होता तो… कुंतीमातेला दिलेले वचन युद्धभूमीवर अगदी तंतोतंत पाळणारा पहिला पांडव होता तो… मरण समोर दिसत असतानाही एका गरीब वृद्धाला आपले सोन्याचे सुळे दात दान करणारा खरा दानवीर होता तो… भगवान श्रीकृष्णाला आपल्या संपूर्ण आयुष्यात तीनच लोक प्रिय होती… राधा, देवकी माता आणि… कर्ण… तर असा कौंतेय होता तो…
कर्णाने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना सर्व काही देण्यामध्ये व्यतीत केलं आणि त्या बदल्यात कधीच काही अपेक्षा केली नाही…निस्वार्थीपणे सगळं केलं…अगदी सहज केलं दान सगळं… आपण युद्धामध्ये कवच कुंडलाशिवाय कमकुवत होऊ शकतो, हे माहीत असून पण ते ही देऊन टाकलं . तर तात्पर्य असं की कर्णाचा हा गुण आपल्यामध्ये आला तर आपलं आयुष्य किती बदलून जाईल… प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार आसपासच्या लोकांना मदत केली तर किती छान होईल ना… कारण आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतं… पण मी म्हणतो, की फक्त पैसेच दान द्यावे अस कोणी सांगितलं आहे का??… एखाद्याला आपले आधाराचे दोन शब्द देऊन तर बघा ना … एखाद्याला आपलं ज्ञान देऊन बघा ना…एखाद्याला आपले चांगले विचार देऊन बघा ना…आणि काहीच नाही जमलं तर एखाद्याला फक्त आपला वेळ देऊन बघा ना…फक्त एखाद्याच नुसतं बोलणं ऐकून बघा… त्याच दुःख ऐकून बघा… आणि हे सगळं करण्यासाठी गरीब , श्रीमंत अस वर्गीकरण असावं असं काहीच नाही… फक्त मदत करण्यासाठी चांगली नियत असावी लागते… तरच खऱ्या अर्थाने कर्णाने केलेलं दान, आत्मसमर्पण, त्याग ह्यांचं चीज होईल असं मी म्हणेन… आणि अजून एक म्हणजे हे निस्वार्थ जीवन जगण्यासाठी वेगळे असे प्रयत्न करावे असेही काही नाही… जसं कर्णाने ते आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये करून दाखवलं… तसं आपण ही ते करू शकतो… म्हणजे त्यासाठी आवर्जून असे वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत… आणि मग ती आपली एक जीवनशैली बनलेली असेल… निस्वार्थता एक जीवनशैली …
तर मग एकदा करून बघायला काय हरकत आहे … आजपासून सुरवात करा… अगदी आतापासून… अगदी ह्या क्षणापासून…
प्रमोद कमलाकर निजामपुरकर
June 20, 2021 @ 9:40 pm
खुपच छान! मृदुल, . कोणी लिहीलय.
MN
June 20, 2021 @ 11:00 pm
धन्यवाद. मंदार आमच्या मराठी विभागातील मुख्य लेखक आहेत.